प्रभात वृत्तसेवा पिंपरी – किरकोळ कारणावरून पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच आरोपी पतीने स्वतःवरही वार करून घेतले. ही घटना ही घटना शनिवारी (दि. ६) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास शांताबाई कॉलनी, शिवाजीवाडी, मोशी येथे घडली. राम सोपान सुर्यवंशी (वय २२, रा. शिवाजीवाडी, मूळ रा. वाघदरी, ता. उदगीर, जि. लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. त्याने केलेल्या चाकू हल्ल्यात २१ वर्षीय पत्नी गंभीर जखमी झाली असून तिने शनिवारी याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि तिच्या पतीमध्ये जुन्या घरमालकाकडे राहिलेल्या सामानावरून वाद झाला. संतापाच्या भरात आरोपीने स्वयंपाकाच्या चाकूने फिर्यादीच्या चेहऱ्यावर, मानेवर व हातांवर वार करून गंभीर जखमी केले. फिर्यादीच्या आजीने हस्तक्षेप केल्याने ती बचावली. स्वतःला निर्दोष दाखवण्यासाठी आरोपीने स्वतःच्याही हातावर चाकू मारून जखमी केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.