HSC Student Death : बारावीच्या बोर्ड परीक्षेला जाणाऱ्या एका १८ वर्षीय विद्यार्थ्याचा ठाणे जिल्ह्यात लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळच्या गर्दीच्या वेळी हा अपघात घडला आहे. सोहम कथरे असे मरण पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो डोंबिवली येथील रहिवासी होता. हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जाणाऱ्या ट्रेनच्या फूटबोर्डवरून प्रवास करत असताना त्याची पकड सुटली आणि तो रुळावर पडला, असे ठाणे जीआरपीच्या वरिष्ठ निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रुळाजवळ एक जखमी किशोरवयीन मुलगा पडल्याचे रस्त्याने जाणाऱ्यांनी पाहिले आणि त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला सरकारी रुग्णालयात हलवले, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले. अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी महाराष्ट्रात बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. कथरे हा कळवा येथील त्यांच्या परीक्षा केंद्रावर जात होता.