प्रभात वृत्तससेवा मंचर – पुणे-नाशिक महामार्गावर परळ ते साकोरी या एसटी बस चालकास व बस मधील एका प्रवाशास मारहाण केल्याप्रकरणी प्रदीप दत्तात्रय माशेरे, सिद्धेश दत्तात्रय माशेरे (दोघे रा. मंचर) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बसचालक भरत पांडुरंग बुगदे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 4 डिसेंबर रोजी परळ आगाराची परळ – साकोरी एसटी बस (एमएच 13 सीयू 6065) तिचा वाहक अमित अरुण कर्पे, चालक भरत पांडुरंग बुगदे हे बसमध्ये प्रवासी घेऊन जात असताना बस पुणे – नाशिक महामार्गावर अवसरी फाटा येथे आली असता. एका थार चालक व बस चालकाची कट मारल्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. हा वाद मिटवून एसटी बस सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मंचर बसस्थानकावर आली असता त्या ठिकाणी असलेल्या दोन युवकांनी एसटीचा दरवाजा उघडून बसमध्ये शिरून बसचालक भरत बुगदे यास तुम्ही थार गाडीवाल्या बरोबर भांडण का केली असे म्हणून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी बस वाहक अमित कर्पे व एक प्रवासी भांडणे सोडवण्यासाठी आला असता त्यांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.