पुणे – बाणेर रस्त्यावरील हिट अँड रन प्रकरणात तब्बल पाच महिने माग काढत बाणेर पोलिसांनी फरार ऑटोरिक्षा चालकाला उत्तर प्रदेशातील गर मुकेश्वर (मेरठ जवळ) येथून अटक केली. ऑटोरिक्षा चालकाने एका ज्येष्ठ नागरिकास धडक दिली होती. गंभीर जखमी झालेल्या नागरिकास रुग्णालयात दाखल करण्याचा बहाणा त्याने केला. यानंतर नागरिकास रस्त्याच्या कडेला सोडून पळ काढला. वेळेवर उपचार न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इस्रायल गुर्जर (२३) असे असून पोलिसांनी त्याला शनिवारी ट्रांझिट रिमांडवरून पुण्यात आणले. या प्रकरणात गोपाल वाघ (६३) या निवृत्त लॉ फर्म कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सांगितले की, २० जुलै रोजी बाणेर रस्त्यावरील एटीएममधून पैसे काढून वाघ रस्ता ओलांडत होते. त्यावेळी आरोपीच्या ऑटोने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर नागरिकांनी आरोपीला थांबविले. त्याला जाब विचारायला सुरवात करताच, त्याने जखमीला रुग्णालयात नेण्याचे आश्वासन दिले. मात्र, मदत करण्याऐवजी त्याने वाघ यांना रेंज हिल परिसरातील निर्मनुष्य जागेत फेकून पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस ऑटोचा माग काढत रेंज हिलपर्यंत पोहचले, जिथे वाघ हे गंभीर अवस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. – आरोपीचा पाच महिने पाठलाग – बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ऑटोचा शोध घेतला आणि तो सांगवी येथे पार्किंगमध्ये आढळला. वाहन मालकाला चौकशीदरम्यान आरोपीचे नाव व फोन नंबर मिळाला. त्याच्या शोधार्थ पोलिसांनी वारंवार दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी छापे टाकले, मात्र गुर्जर सतत ठिकाणे बदलत असल्याने तो हाताशी येत नव्हता. फरार झाल्यानंतर गुर्जरने आपला मोबाईल व सिमकार्ड फेकून दिले आणि काही ठिकाणी सुतारकाम सुरू केले. तो सतत ठिकाण बदलत राहिला आणि फोन स्विच ऑफ ठेवत होता. अखेर त्याने एकदा वडिलांना फोन केल्याने त्याचे लोकेशन उघड झाले आणि पोलिसांनी त्याला जेरबंद केले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम १०५ (खून न ठरता मानवी हत्येचा गुन्हा), कलम २३८ (पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न) तसेच मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय पोलिसांनी आता आरोपीला वाहन देणाऱ्या ऑटो मालकावरही कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरामध्ये अनेक रिक्षा मालक दोन चार रिक्षा नावावर विकत घेऊन त्या रात्री शिफ्टने चालवायला देतात. त्या शिफ्टने चालवायला देताना संबंधीत चालकाचा परवाना, आरटीओ बॅच तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी करत नाहीत. तसेच ॲटो चालकही अनेकदा परराज्यातील असतात. त्यांच्याकडून रात्रीच्या वेळी शिफ्टच्या रिक्षांचा गुन्हेगारीसाठी वापर केला जातो. अपघातासारखी घटना घडल्यास मालकांजवळ चालका संदर्भात काहीच माहिती नसते. यामुळे पोलिसांना आरोपींचा माग काढणे अनेकदा अवघड बनते. या घटनेतही मालकाची बेपवाई दिसून आलयाने त्याच्यावर कायदेशीर बडगा उगारण्यात येणार आहे. ही हीट ॲण्ड रनची घटना असली तरी आम्ही ती गांभीर्याने घेतली होती. मृताला कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवून द्यायचा होता. आम्ही तब्बल पाच महिणे आरोपीच्या मागावर होता. त्याचे प्रत्यक्षात लोकेशन मिळाल्यावर पथक तब्बल वीस दिवस त्याचा पाठलाग करत होते. – चंद्रशेखर सावंत (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाणेर) ही कामगिरी, अपर पोलीस आयुक्त, (पश्चिम प्रादेशिक विभाग ) मनोज पाटील, उप-आयुक्त, (परि.४) सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त( खडकी) विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), अलका सरग यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक के.बी डाबेराव, राहा. पोलीस निरीक्षक रायकर, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रितम निकाळजे, शरद राऊत, गजानन अवातिरक, प्रदिप खरात, रोहीत पाथरुट व स्वप्नील मराठे यांनी केली आहे.