Father Arrested – बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत घृणास्पद घटना चाकणमधील दावडमळा परिसरात उघडकीस आला आहे. पोटच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधम बापाला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्र सुभाष राठोड (वय 39, सध्या राहणार दावडमळा कोहिनूर बिल्डिंग) असे या नराधम बापाचे नाव आहे. 30 मार्च रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 च्या दरम्यान ही घटना घडली. आरोपी राजेंद्र राठोड हा व्यवसायाने ड्रायव्हर आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलीची आई घरात नसल्याची संधी साधून, आरोपीने आपल्याच अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित मुलीने घाबरून न जाता थेट पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या नराधम बापाविरुद्ध तक्रार दिली. चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारी नंतर पोलीस हवालदार प्रितम ढमढेरे, योगेश्वर कोळेकर, पोलीस शिपाई महेश कोळी यांनी तपासयंत्रणा वेगाने फिरवत आरोपीला नाशिक फाटा येथून अटक करण्यात आली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम हे करीत आहेत.