प्रभात वृत्तसेवा पुणे – शिवसेनेच्या (शिंदे) पक्षाच्या एका उमेदवाराने आपल्याच पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराचा ‘एबी’ अर्ज गिळल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात मंगळवारी ही घटना घडली.याप्रकरणी उद्धव लहू कांबळे (वय ३४, रा. विवेकानंदनगर काॅलनी, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक निवडणूक अधिकारी मनीषा भुतकर (वय ५८) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (३० डिसेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ समीप आल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी इच्छुक उमेदवारांना ‘एबी’ अर्ज दिले. त्यामुळे एका जागेसाठी दोन-दोन जणांना अर्ज वाटप करण्यात आले. महापालिकेच्या सहकारनगर-पद्मावती या प्रभाग क्रमांक ३६ साठी शिवसेनेकडून पहिल्यांदा मच्छिंद्र ढवळे यांना ‘एबी’ अर्जही देण्यात आला. मात्र, त्यानंतर शिवसेनेकडून उद्धव कांबळे यांना ‘एबी’ अर्ज देण्यात आला आणि तेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ढवळे यांची उमेदवारी कायम राहिल्याने छाननीच्या वेळी कांबळे यांनी ढवळे यांना दिलेला ‘एबी’ अर्ज खाऊन गिळला. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली, त्यानंतर सहायक निवडणूक अधिकारी मनीषा भुतकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचे भुतकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.