प्रभात वृत्तसेवा नसरापूर – पुणे-सातारा महामार्गावर वेळू गावाच्या हद्दीत (ता. भोर) शुक्रवारी (दि. १९) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भरधाव कारने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चार तरुण जखमी झाले असून सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भूषण किरण गिरीगोसावी (वय २२, सध्या रा. कोथरूड, पुणे) यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. भूषण हे मित्र शिवचरण वाघमोडे यांच्यासह दुचाकीवरून सातारा बाजूकडे जात होते. त्याचवेळी संकेत खारतोडे हा दुसरी दुचाकी चालवत होता. त्याच्या पाठीमागे प्रवीण दराडे बसला होता. दरम्यान, यश मनोजकुमार खैरनार (वय २१, रा. उत्तमनगर, पुणे) हा त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवत, त्याने दोन्ही दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत भूषण गिरीगोसावी, शिवचरण वाघमोडे, संकेत खारतोडे व प्रवीण दराडे हे चौघेही जखमी झाले. अपघातात वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी हलवले. या प्रकरणी पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे.