प्रभात वृत्तसेवा पुणे – एरंडवणे येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात २३ डिसेंबरला दुपारी मोठी खळबळ उडाली. एका निलंबित कृषी सेवकाने कोयता घेऊन कार्यालयात घुसखोरी करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात तोडफोड केली तसेच कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत रमेश लक्ष्मण सकपाल (वय ५७) यांनी तक्रार दिली असून ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. आरोपी सचिन कांबळे याची २६ मार्च २०१३ रोजी कृषी सेवक म्हणून राजगुरुनगर येथील जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिकेत नियुक्ती झाली होती. मात्र, नियुक्तीनंतर सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्याची सेवा थांबवण्यात आली होती. नंतर प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्याला पुन्हा कामावर घेण्यात आले आणि पदोन्नतीही देण्यात आली. यानंतर जून २०१६ पासून आरोपी कामावर गैरहजर राहू लागला. त्याचा पगार व भत्ते बंद करण्यात आल्याने तो नाराज होता. याच रागातून २३ डिसेंबरला तो जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आला, सुरुवातीला त्याने विशाल शिंदे नावाच्या कर्मचाऱ्याशी खासगी चर्चा केली. त्यानंतर तो थेट जिल्हा अधीक्षकांच्या कक्षात गेला. त्या वेळी अधीक्षक उपस्थित नसल्याचे सहाय्यक अधिकारी यांनी सांगितले. मात्र, यानंतर आरोपी अधिकच चिडला, शिवीगाळ करत कक्षात घुसला आणि टेबलवरील संगणकासह साहित्याची तोडफोड केली. रमेश सकपाल व इतर कर्मचारी त्याला रोखण्यासाठी गेले असता आरोपीने हातातील कोयता काढून सर्वांच्या दिशेने दाखवला व या कार्यालयात कोणीही काम करणार नाही, जो काम करेल त्याला ठार मारीन, अशी धमकी दिली. भीतीमुळे कर्मचाऱ्यांनी तत्काळ ११२ आणि १०० क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने १७ जुलै २०१४ मध्ये आरोपीला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तो सातत्याने गैरहजर होता. वेतन व भत्ते न मिळाल्याच्या रागातूनच त्याने ही हिंसक कृती केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.