Crime News : इंदूर येथील शासकीय महात्मा गांधी स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंतरिक्ष अग्रवाल असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो ग्वाल्हेरचा रहिवासी होता. २ फेब्रुवारी रोजी त्याचा मृतदेह वसतिगृहातील खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. याप्रकरणी आता त्याच्या कुटुंबीयांनी महाविद्यालयातील वरिष्ठ विद्यार्थ्यांवर रॅगिंग आणि छळाचे आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. महाविद्यालयातील रॅगिंगमुळे अंतरिक्ष पूर्णपणे खचला होता. त्यांनी त्याला परिस्थितीशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता, मात्र तो इतक्या टोकाच्या नैराश्यात जाईल याची पुसटशी कल्पनाही आपल्याला नव्हती.असे त्याच्या वडिलांनी सांगितले. अंतरिक्षच्या बहिणीने वरिष्ठ विद्यार्थ्यांनी लादलेल्या जाचक नियमांचा पर्दाफाश केला आहे. कनिष्ठांना खोलीचे दरवाजे उघडे ठेवून झोपावे लागायचे जेणेकरून वरिष्ठ कधीही आत येऊ शकतील, मोठ्यांसमोर मान खाली घालून चालावे लागायचे आणि मेसमध्ये वरिष्ठ असताना कनिष्ठांना उभे राहून जेवावे लागायचे, असे धक्कादायक आरोप कुटुंबीयांनी केले आहेत. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. सुरुवातीच्या चौकशीत विद्यार्थ्यावर शैक्षणिक ताण असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र कुटुंबीयांनी हा दावा फेटाळून लावला आहे. हे पण वाचा : Tejashwi Yadav : सत्ताधाऱ्यांकडुन निवडणुकीत 40 हजार कोटींची उधळण; तेजस्वी यादव यांचा आरोप