प्रभात वृत्तसेवा पिंपरी – क्रिकेट सामन्यावर मोबाइलद्वारे बेटिंग चालत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला अटक केली. तसेच तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी (दि. ६) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास बाळगोपाळ शाळेजवळील वाघेरे पार्क सोसायटीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली. भावेश प्रदीप लखवानी (वय २५, रा. विजय अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०१, धनराज सोसायटीसमोर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे. तसेच पांडे (वय अंदाजे ४०, पूर्ण नाव माहिती नाही. रा. पिंपरी) आणि किरण (वय अंदाजे ४०, पूर्ण नाव माहिती नाही. रा. पिंपरी) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार मोहीसिन रमजान शेख (वय ३५) यांनी शनिवारी (दि. ६) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून भारत-आफ्रिका क्रिकेट सामन्यावर मोबाइल फोनद्वारे अवैधरीत्या बेटिंग स्वीकारत होते. या दरम्यान आरोपीकडून किंमत अंदाजे १ लाख रुपये असलेला पांढऱ्या रंगाचा ‘सॅमसंग गॅलेक्सी Z-Fold 6’ मोबाइल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे विनापरवाना आणि अनधिकृत बेटिंग रॅकेट चालवत असल्याची खात्री झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. याशिवाय पोसिलांनी अन्य सहा मोबाइल देखील जप्त केले. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.