प्रभात वृत्तसेवा पुणे – चंदननगरमधील ऑक्सिजन पार्क येथे शनिवारी झालेला युवकाचा खून प्रेमसंबंधातील वादातून झाला असून याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. एका अल्पवयीनालाही ताब्यात घेतले आहे.लखन बाळू सकट ( १८, रा. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) याचा खून झाला आहे. याप्रकरणी प्रथमेश शंकर दारकू ( २०), यश रवींद्र गायकवाड ( १९), जानकीराम परशुराम वाघमारे ( १८), महादेव पांडुरंग गंगासागरे ( १९), बालाजी आनंद पेदापुरे (१९, सर्व रा. बोराटे वस्ती, चंदननगर) यांना अटक केली आहे. लखनचे काका केशव बबन वाघमारे ( ३२, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांनी चंदननगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून लखन सकट आणि आरोपी यश गायकवाडमध्ये वाद झाला होता. शनिवारी (६ नोव्हेंबर) आरोपी यशने लखनला चंदननगरमधील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क परिसरात बोलावून घेतले. लखन मित्रासाेबत तेथे आला. तेव्हा यश गायकवाडने याने मुलीशी तुझा संबंध काय आहे. तू का मध्ये पडतो’, अशी विचारणा केली. त्यानंतर दोघांत पुन्हा वाद झाला. त्यानंतर यश आणि इतरांनी लखनला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या लखनला खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार पाच आरोपींसह अल्पवयीनाला रात्री उशीरा ताब्यात घेतले. फरारी झालेल्या दोन ते तीन जणांचा शोध सुरू असल्याची माहिती ढाकणे यांनी दिली.