प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. १८ डिसेंबर) सकाळी वाघजाईनगर येथील तळेगाव चाकण रोडवर घडली.या प्रकरणी देशराज साहब सिंगलोधी (वय ३५, रा. महाळुंगे इंगळे) यांनी गुरुवारी (दि. १८) उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयशर ट्रक चालक अजय वकील यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने आपला ट्रक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवला. या ट्रकने समोरून येणाऱ्या रिक्षाला धडक दिली, ज्यामुळे फिर्यादीचा मित्र रामसुंदर साकेत आणि प्रवाशी पिंटू बिहीरा यांचा मृत्यू झाला. तसेच रिक्षा चालक रोहिदास आडे आणि प्रवाशी सागर मोंटी हे गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.