नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणा (CBI) ने उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र जय अनमोल अनिल अंबानी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाची (Union Bank of India) २२८.०६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँकेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. अनमोल अंबानी यांनी त्यांच्या समूह कंपनीच्या माध्यमातून बँकेकडून कर्ज घेतले होते, मात्र ते वेळेत न फेडल्यामुळे बँकेला मोठे आर्थिक नुकसान झाले, असा आरोप आहे. ४५० कोटींच्या क्रेडिट सुविधेचा गैरवापर – युनियन बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीनुसार, अनमोल अंबानी यांच्या आरएचएफएल (RHFL) या कंपनीने आपल्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेच्या मुंबई येथील एससीएफ शाखेकडून ₹४५० कोटींची क्रेडिट मर्यादा घेतली होती. ही सुविधा देताना बँकेने अनेक अटी घातल्या होत्या, ज्यात वेळेवर हप्ते, व्याज भरणे आणि सर्व विक्रीतून मिळणारे उत्पन्न बँक खात्यातूनच वळवणे बंधनकारक होते. कर्ज थकले, फंड वळवला- कंपनीने कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नाहीत, ज्यामुळे हे खाते ३० सप्टेंबर २०१९ रोजी एनपीए (Non-Performing Asset) म्हणून घोषित करण्यात आले. बँकेच्या तक्रारीनंतर, १ एप्रिल २०१६ ते ३० जून २०१९ या कालावधीसाठी फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले. या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या. ऑडिटमध्ये असे आढळले की, उचललेल्या फंडाचा गैरवापर (Diversion of Funds) करण्यात आला. कर्ज ज्या मूळ व्यावसायिक उद्देशासाठी घेतले होते, त्यासाठी न वापरता ते अन्य कामांसाठी खर्च करण्यात आले. खात्यांमध्ये फेरफार आणि फसवणुकीचा आरोप बँकेने स्पष्ट आरोप केला आहे की, कंपनीचे माजी प्रवर्तक/संचालक असलेल्या आरोपींनी खात्यांमध्ये फेरफार करून निधीचा गैरवापर केला. त्यांनी बँकेने दिलेल्या अर्थसहाय्याचा दुरुपयोग करून पैसा दुसरीकडे वळवला. यामुळे युनियन बँक ऑफ इंडियाचे ₹२२८ कोटींचे मोठे नुकसान झाले. सीबीआयने आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे, ज्यात फंडाचा नेमका कुठे वापर झाला आणि अन्य कोणती आर्थिक अनियमितता झाली, याची तपासणी केली जाईल.