नागपूर : नागपूर येथे कार्यरत असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (कोल इंडियाची उपकंपनी) एक अधिकारी आणि त्यांच्या पत्नीवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बेहीशेबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. संदीप सिंग आणि श्वेता सिंग अशी दोघांची नावे आहेत. संदीप सिंग हे या सरकारी कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर आहेत. हे दांम्पत्य नागपूरमधील काटोल रोड येथे राहतात. सीबीआयच्या माहीतीनुसार, सिंग यांनी १ ऑगस्ट २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत स्वतःच्या आणि पत्नीच्या नावावर जंगम आणि स्थावर मालमत्ता कथितरित्या जमा केली. काळा पैसा वळवण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी त्यांच्या पत्नीच्या नावावर एका बोगस कंपनीचा वापर करण्यात आला. सखोल तपासणीत समोर आले की, या दोन वर्षांच्या कालावधीत या दाम्पत्याचे एकूण उत्पन्न १.२७ कोटी रुपये होते. तर त्यांची मालमत्ता १.६२ कोटी रुपयांवरून २.८७ कोटी रुपयांपर्यंत वाढली होती. कथित बेहिशेबी मालमत्ता ४५.२३ लाख रुपये आहे. त्यांच्या निवासस्थानी केलेल्या झडतीमध्ये मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, असे सीबीआयने सांगितले.