प्रभात वृत्तसेवा नसरापूर – कांजळे (ता. भोर) येथे कौटुंबिक जागेच्या वादातून कुटुंबातील सदस्यांमध्ये जोरदार वाद होऊन मारहाणीची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास कांजळे गावच्या हद्दीत ही घटना घडली. फिर्यादी चंद्रकांत दिनकर गाडे (वय ६०, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, ता. हवेली) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतण्या विकास पांडुरंग गाडे याच्या घरासमोर तीन खण जागा देण्याच्या मागणीवरून वाद झाला. यावेळी विकासने जागा देण्यास नकार देत वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. विकास गाडे याने चंद्रकांत गाडे व त्यांचा मुलगा संतोषला हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच विकासची मुलगी कु. पल्लवीने विटेने चंद्रकांत गाडेना मारल्याचे नमूद करण्यात आले आहे. विकासची पत्नी सौ. सुरेखा व भावजय अरुणा गाडे यांनी फिर्यादीची पत्नी रत्नमाला हिला मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.दरम्यान, याच घटनेबाबत दुसऱ्या बाजूने विकास पांडुरंग गाडे (वय ४८, रा. कांजळे, ता. भोर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोर चुलते चंद्रकांत गाडे, चुलत भाऊ संतोष गाडे, चुलती रत्नमाला गाडे व प्रणव प्रभाकर जाधव हे आले. तीन खण जागा परत घेण्याच्या कारणावरून वाद उफाळून आला. या वेळी चंद्रकांत गाडे यांनी लोखंडी गजाने विकास यांच्या पत्नी सौ. सुरेखा तसेच संतोष गाडे यांनी लाकडी काठीने विकास यांना मारहाण केली. तर प्रणव जाधव याने अरुणा गाडे यांना हाताने तर रत्नमाला गाडे यांनी कु. पल्लवी हिला मारहाण केल्याचा आरोप असून, सर्वांनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप केले असून, एकाच घरातील नातेवाईकांमध्ये जागेच्या वादातून हा संघर्ष टोकाला गेला आहे. राजगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू आहे.