प्रभात वृत्तसेवा पुणे – बाणेर रस्त्यावरील हिट अँड रन प्रकरणाचा तब्बल पाच महिने तपास करून बाणेर पोलिसांनी फरार ऑटोरिक्षा चालकाला उत्तर प्रदेशातील गर मुकेश्वर ( मेरठ जवळ ) येथे अटक केली. या रिक्षा चालकाने एका ज्येष्ठास धडक दिल्यावर जखमीला रुग्णालयात दाखल करण्याचा बहाणा केला. यानंतर जखमीला रस्त्यावर सोडून पळ काढला.वेळेवर उपचार मिळाले नसल्याने ज्येष्ठाचा मृत्यू झाला होता. अटक केलेल्या आरोपीचे नाव इस्रायल गुर्जर (२३) असे असून पोलिसांनी त्याला शनिवारी ट्रांझिट रिमांडवरून पुण्यात आणले. या घटनेत गोपाल वाघ (६३) या लॉ फर्मच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.पोलिसांच्या माहितीनुसार २० जुलै रोजी बाणेर रस्त्यावरील एटीएममधून वाघ हे पैसे काढून रस्ता ओलांडत होते. यावेळी आरोपीच्या ऑटोने त्यांना धडक दिली. अपघातानंतर नागरिकांनी आरोपीला थांबविले. त्याला जाब विचारायला सुरवात करताच, त्याने जखमीला रुग्णालयात नेण्याचे आश्वासन दिले. मात्र, मदतीऐवजी त्याने वाघ यांना रेंज हिल परिसरातील निर्मनुष्य जागेत फेकून पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस ऑटोचा माग काढत रेंज हिलपर्यंत पोचले, तेथे वाघ हे गंभीर अवस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले असता मृत घोषित केले. वडिलांना केला फोन… बाणेर ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ऑटोचा शोध घेतला. ती सांगवीत पार्किंगमध्ये आढळली. वाहन मालकाला चौकशीदरम्यान आरोपीचे नाव व फोन नंबर मिळाला. त्याच्या शोधार्थ पोलिसांनी वारंवार दिल्ली, उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी छापे टाकले, मात्र गुर्जर सतत ठिकाणे बदलत असल्याने हाताशी येत नव्हता. फरार झाल्यानंतर गुर्जरने मोबाइल, सिमकार्ड फेकून दिले. काही ठिकाणी सुतारकाम केले. तो सतत ठिकाण बदलत , फोन स्विच ऑफ ठेवत हुलकावणी देत होता. अखेर त्याने एकदा वडिलांना फोन केल्याने त्याचे लोकेशन उघड झाले आणि पोलिसांनी त्याला जेरबंद केले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीवर मानवी हत्येचा गुन्हा, (पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला वाहन देणाऱ्या मालकावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मालकांची बेपवाई शहरामध्ये अनेक रिक्षा मालक दोन-चार रिक्षा नावावर विकत घेऊन त्या रात्री शिफ्टने चालवायला देतात. यावेळी चालकाचा परवाना, आरटीओ बॅच तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी करत नाहीत. तसेच ऑटो चालकही अनेकदा परराज्यातील असतात. त्यांच्याकडून रात्रीच्या वेळी शिफ्टच्या रिक्षांचा गुन्हेगारीसाठी वापर केला जातो. अपघातासारखी घटना घडल्यास मालकांजवळ चालकाची काहीच माहिती नसते. यामुळे पोलिसांना आरोपींचा माग काढणे अनेकदा अवघड बनते. या घटनेतही मालकाची बेपवाई दिसल्याने त्याच्यावर कायदेशीर बडगा उगारला आहे. “ही हीट ॲण्ड रनची साधी घटना नव्हती . मृत व्यक्तीस न्याय मिळवून देणे आमचे कर्तव्य होते. तब्बल पाच महिने आम्ही आरोपीच्या मागावर होतो. प्रत्यक्षात लोकेशन मिळाल्यावर सतत वीस दिवस पथक त्याचा पाठलाग करत होते. शेवटी आम्ही त्याला पकडलेच.” -चंद्रशेखर सावंत (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाणेर)