प्रभात वृत्तसेवा आळेफाटा – आळेफाटा एस.टी. स्टँड परिसरात एका २५ ते ३० वयच्या अनोळखी तरुणाचा गूढ मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.अचानक फिट येऊन खाली कोसळलेल्या या तरुणास तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदनानंतरही ठोस माहिती समोर आलेली नाही. मयत तरुणाची ओळख पटवण्यासाठी त्याच्या शरीरावरील विशिष्ट खुणा महत्त्वाच्या ठरणार आहेत. मयताच्या अंगावर हिरव्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट आणि काळी जिन्स आहे. त्याच्या डाव्या पायाच्या पोटरीवर इंग्रजीमध्ये King Cap असे तर उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ K असे टॅटू आढळले आहेत. तसेच त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याजवळील बोट अर्धवट असल्याचे निदर्शनास आले आहे. आळेफाट्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय केली आहे. नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीणसह इतर पोलीस ठाण्यांना माहिती पाठवण्यात आली आहे. दररोज शेकडो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी हा मृत्यू झाल्याने तो तरुण कोण होता आणि कुठून आला होता, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी आळेफाटा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक फौजदार चंद्रा डुंबरे यांनी केले आहे.