प्रभात वृत्तसेवा पिंपरी – ग्रामपंचायतीच्या ड्रेनेजचे काम सुरू असताना दोन जणांनी ते बंद पाडले. याबाबत ठेकेदाराने विचारणा केली असता त्यावर चाकूने वार केल्याची घटना चिंबळी सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी मंगळवारी (दि.२०) दोघांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत स्वप्निल नामदेव लोखंडे (वय ३२, रा.बर्गे वस्ती, चिंबळी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सूर्यकांत कटिंग आणि सुजित बोराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चिंबळी येथील बर्गे वस्ती भागात घडली. फिर्यादी यांनी जेसीबी चालवण्यासाठी घेतला आहे. जेसीबीचा चालक जेसीबीच्या सहाय्याने ग्रामपंचायतचे ड्रेनेजचे काम करत होता. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी काम बंद पाडले. जेसीबी चालकाला चाकूचा धाक दाखवला. याबाबत फिर्यादी लोखंडे हे आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी लोखंडे यांना मारहाण करून त्यांच्यावर चाकूने वार करत जखमी केले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.