शिरूर: जमिनीच्या वादातून नात्याला काळिमा फासणारी घटना शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे घडली आहे. सामायिक शेतजमिनीच्या खासगी मोजणीवरून झालेल्या वादात पुतण्याने काकावर काठीने हल्ला करत बेदम मारहाण केली. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर जालिंदर इचके (६५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी सकाळी गट क्रमांक ९९९ च्या शेतात जमिनीची मोजणी सुरू असताना, पुतण्या वसंत कारभारी इचके याने मोजणीला विरोध करत शिवीगाळ सुरू केली. “मोजणी मान्य नसेल तर सरकारी मोजणी करा,” असे काकांनी सांगताच चिडलेल्या वसंतने काठीने मारहाण करून त्यांना जखमी केले. त्याच वेळी आरोपीची मुले अमोल आणि समीर इचके यांनीही हातात काठ्या घेऊन ‘रानातून बाहेर निघा’ अशी धमकी देत दहशत निर्माण केली. शिरूर पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध मारहाण व दमदाटीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस हवालदार अरुण उबाळे पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागात जमिनीच्या वादातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.