प्रभात वृत्तसेवा पुसेसावळी – औंध पोलीस ठाणे अंतर्गत अंकित पुसेसावळी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत अलीकडच्या काळात चोर्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे अनेक गावे सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या निगराणीखाली असतानाही चोरट्यांचा छडा लवकर लागत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घरफोडी, दुकाने फोडणे, शेतीपंप, मोटारसायकली तसेच घरातील मौल्यवान वस्तू चोरीस जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र चोरी झाली तरी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तक्रार करूनही ठोस कारवाई होत नाही, वेळ आणि खर्च वाया जातो, अशी भावना अनेक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. परिणामी अनेक घटना पोलिसांच्या नोंदीपर्यंत पोहोचतच नाहीत. चोरांना आळा घालण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा व दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या. रात्रीची गस्त, संशयितांवर नजर ठेवणे, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन अशा उपाययोजना कागदावर दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही आरोपी ओळखण्यात व अटक करण्यात विलंब होत असल्याने चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.चोर्यांवर नियंत्रण व चोरट्यांवर ठोस कारवाई करून गुन्हे उघडकीस केव्हा येणार? हा थेट प्रश्न आता ग्रामस्थ पोलीस प्रशासनाला विचारत आहेत. या पार्श्वभूमीवर औंध पोलीस ठाणे व अंकित पुसेसावळी दूरक्षेत्राने विशेष पथक नेमणे, रात्रीची गस्त वाढवणे, सीसीटीव्ही विश्लेषणासाठी तांत्रिक मदत घेणे व तक्रारदारांना विश्वासात घेऊन तत्काळ कारवाई करणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी होत आहे. अन्यथा चोर्यांचे वाढते प्रमाण ग्रामीण शांततेस मोठा धोका ठरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.