प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – करंजावणे (ता. शिरूर) येथे शेतातील कांदे जाणूनबुजून पेटवून देऊन नुकसान केल्याचा जाब विचारल्यामुळे सख्ख्या भावाने भावाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रवींद्र हरिभाऊ कुदळे यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र कुदळे यांच्या शेतात कांद्याचे पीक काढणीला आलेले असताना, त्यांचा सख्खा भाऊ चंद्रकांत हरिभाऊ कुदळे आणि वहिनी स्वाती चंद्रकांत कुदळे यांनी हे कांदे जाणूनबुजून पेटवून दिले. यामुळे पिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत रवींद्र यांनी विचारणा केली असता, चंद्रकांत आणि त्यांच्या पत्नीने त्यांना मारहाण करून जखमी केले.रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या घटनेची दखल घेत चंद्रकांत कुदळे व स्वाती कुदळे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत भाऊच भावाचा वैरी ठरला आहे.