प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पुणे-बेंगलोर महामार्गावर सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून उभा केलेल्या ट्रकमुळे झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १७ डिसेंबर) रोजी रात्री पुनावळे येथील एच.पी. पेट्रोल पंपासमोर घडली.याबाबत निखिल नितीन धनावडे (वय २१, रा. पर्वती, पुणे) यांनी गुरुवारी (दि. १८) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टाटा हायवा ट्रक चालक चंद्रशेखर बाबासाहेब शिंदे (वय ४२, रा. वाकड) याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादीचा मित्र आदर्श जगताप हा दुचाकीवरून जात असताना, आरोपीने आपला हायवा ट्रक महामार्गाच्या डाव्या लेनमध्ये उभा केला होता. ट्रकचे पार्किंग लाईट किंवा इंडिकेटर चालू नव्हते. तसेच तिथे कोणतेही रिफ्लेक्टर ठेवलेले नव्हते. यामुळे आदर्शच्या दुचाकीची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.