प्रभात वृत्तसेवा पिंपरी – जुन्या भांडणाच्या रागातून एका टोळक्याने कोयता आणि दांडक्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना गुरुवारी (दि. १८ डिसेंबर) रात्री जुनी सांगवी येथील सी.क्यु.ए.ई. मेन गेट शेजारील गणपती मंदिराजवळ घडली.या प्रकरणी प्रथमेश प्रशांत कवडे (वय २१, रा. जुनी सांगवी) यांनी गुरुवारी (दि. १८) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयुष नरेश गोहिरे (वय २१), विराज आदिकराव काटे (वय २२), रितिकेश गोहिरे (वय २०), सिद्धार्थ निकाळजे (वय २३), सागर जगदनकर, आर्यन थोरात (वय १८), हर्षद आदिकराव काटे, शुभम बाळासाहेब ढवळे (वय २१), सार्थक कदम, साहिल औदुंबर पाटील, मयांक गायकवाड आणि रित्या गुरव (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि त्यांचा मित्र थंडीमुळे शेकत बसले असताना आरोपी दुचाकीवरून तिथे आले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला “तुझा मित्र कुठे आहे” असे विचारत कोयत्याने डोक्यावर वार केला. फिर्यादी जीव वाचवण्यासाठी पळत असताना सर्व आरोपींनी त्यांना पकडून लाथा-बुक्क्यांनी, बेल्टने आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीच्या आईला आणि मित्रालाही मारहाण करण्यात आली. आरोपींनी हवेत शस्त्रे फिरवत परिसरात दहशत माजवली. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.