प्रभात वृत्तसेवा नसरापूर – सातारा-पुणे महामार्गावर वेळ (ता. भोर) गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, या प्रकरणाची नोंद राजगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातात गणपत पांडुरंग इमडे (वय ३७, रा. गुजरवाडी, पुणे; मूळ रा. शिकारा, ता. मुखेड, जि. नांदेड) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचे भाऊ शंकर पांडुरंग इमडे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हुंडाई शोरूमसमोर महामार्गावर आरोपी विवेक विजय गवळी (रा. वारजे माळवाडी, पुणे) हा त्याच्या ताब्यातील तीनचाकी टेम्पो साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने भरधाव व निष्काळजीपणे चालवत होता. रहदारीचे नियम धाब्यावर बसवत गवळीने पुण्याकडे जाणाऱ्या गणपत इमडे यांच्या शाईन दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत इमडे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, काही काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.