प्रभात वृत्तसेवा पिंपरी – एका बस चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात व निष्काळजीपणे बस चालवून मोटारसायकलला धडक दिली, ज्यामुळे मोटारसायकल चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. १३ डिसेंबर) रात्री बिरदवडी येथे घडली.कुलदीप रामचंद्र भिसे (वय ४३, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार परिस बाजीराव दिघे (वय ३७, रा. संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीचा साडू विष्णू कुंडलीक कसबे (वय ४३) हे त्यांचे काम संपल्यानंतर आंबेठाण ते चाकण जाणारे रोडने त्यांच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून (एमएच २० एपी ३९९८) घरी येत होते. रात्री आठ वाजता बी एन एस टॉवर जवळ, बिरदवडी येथे आले असता, चाकण ते आंबेठाण रोडने आंबेठाण बाजूकडे जाणारे आयशर बसचे (एमएच १४/केक्यु ९३९७) चालक असलेल्या आरोपीने मोटारसायकलला धडक देऊन अपघात केला. अपघातामध्ये विष्णू कसबे यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले, तसेच डोक्याला आणि छातीला अंतर्गत गंभीर दुखापत झाली व मोटारसायकलचेही नुकसान झाले. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.