प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील केवटे मळा येथे शनिशिंगणापूरहून देवदर्शन करून परतणाऱ्या युवकांच्या कारला भंगार वाहून नेणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला असून, सागर दत्तात्रय थोरात या २८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कारमधील अन्य तिघे मित्र गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेली माहिती अशी की, सागर थोरात, विनोद खंडागळे, भागवत पवार आणि संतोष सोनवणे हे चौघे एम एच १२ एल जे ६०५५ या कारमधून चाकणच्या दिशेने जात होते. यावेळी चाकण बाजूने येणाऱ्या एम एच १४ एफ सी ६६८३ या ट्रकने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारला समोरून जोरात धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील सर्वजण आत अडकून पडले होते.पोलीस मित्र अतुल थोरवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र कार चालक सागर थोरात याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.या अपघातात विनोद खंडागळे (३०), भागवत पवार (४५) आणि संतोष सोनवणे (रा. चाकण) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी बाळासाहेब मारुती थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालक सुजित तुकाराम मासाळ (२३, रा. चिखली) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार उद्धव भालेराव करत आहेत.