प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावर सोमवारी (दि. १५) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोखंडी सळया भरलेल्या ट्रकला भरधाव वेगाने आलेल्या कारने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात नीलम रामचंद्र दाभाडे (वय ५९, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालक गंभीर जखमी झाला आहे. माहितीनुसार, माणिक यमगर हे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ एच डी ८९९९ क्रमांकाचा लोखंडी सळयांनी भरलेला ट्रक घेऊन जात असताना पहाटेच्या सुमारास ट्रकमध्ये बिघाड झाल्याने त्यांनी तो रस्त्याच्या कडेला उभा केला होता. नगरकडून भरधाव वेगाने आलेल्या एम एच १४ डी एक्स ९८८१ या कारची उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस शिपाई मच्छिंद्र निचित यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांच्या मदतीने कारमधील रामचंद्र राजाभाऊ दाभाडे (रा. मांजरी बुद्रुक) आणि नीलम दाभाडे यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात कार चालक रामचंद्र राजाभाऊ दाभाडे हे गंभीर जखमी झाले, तर नीलम रामचंद्र दाभाडे (वय ५९) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक माणिक शामू यमगर (वय ६१, रा. कोलवडी, ता. हवेली) यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कार चालक रामचंद्र राजाभाऊ दाभाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार श्रावण गुपचे पुढील तपास करत आहेत.