शिरूर: शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा सजातील महिला ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) प्रमीला नागेश वानखेडे (४४) यांना ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली. वडिलांच्या जमिनीचा पंचनामा तक्रारदाराच्या बाजूने करून देण्यासाठी वानखेडे यांनी १० हजार रुपयांची मागणी केली होती, तडजोडीअंती ७ हजार रुपये घेताना ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यावर शुक्रवारी दुपारी २ वाजता न्हावरे-तळेगाव रोडवरील छत्रपती संभाजी चौक येथे सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष लाच स्वीकारताना वानखेडे यांना पकडण्यात आले. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपअधीक्षक भारती मोरे पुढील तपास करत आहेत. तहसील कार्यालयाच्या ढिसाळ कारभारावर संताप या कारवाईमुळे शिरूरच्या महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या शिरूर तहसील कार्यालयाचा कारभार रामभरोसे असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. वारसाच्या नोंदी, खरेदी-विक्री आणि चूक दुरुस्तीच्या कामांसाठी नागरिकांना ६-७ महिने हेलपाटे मारावे लागत आहेत. निर्वी येथील ज्येष्ठ नागरिक अशोक सोनवणे यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, “एका किरकोळ नाव दुरुस्तीसाठी मी सात महिन्यांपासून पायऱ्या झिजवत आहे, पण केवळ तारखा दिल्या जात आहेत.” महसूल विभागातील या ‘तारीख पे तारीख’ संस्कृतीमुळे सामान्य जनता आणि शेतकरी मानसिक व आर्थिकदृष्ट्या भरडला जात असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.