प्रभात वृत्तसेवा पुणे – खासगी कंपनीसाठी भाडेतत्वावर लॅपटाॅप घेण्याचे आमिष दाखवून दाम्पत्याने एकाची एक कोटी २४ लाखांची फसवणूक केली. या दाम्पत्याने घेतलेले लॅपटाॅप परतच केले नाहीत.याप्रकरणी ज्ञानेश्वर शिवाजी पाटेकर, नूतन ज्ञानेश्वर पाटेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आंबेगाव पोलीस ठाण्यातील फिर्यादीनुसार तक्रारदार व्यावासायिकाची गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आरोपी दाम्पत्याशी ओळख झाली होती. आरोपींनी एका खासगी कंपनीला लॅपटाॅप भाडेतत्त्वावर हवे असल्याचे व्यावसायिकाला सांगितले. एका लॅपटाॅपसाठी दरमहा १५ ते २५ हजार रुपये भाडे मिळेल, असे आमिष दाखविले. व्यावसायिकाने ५३४ लॅपटाॅप भाडेतत्त्वावर दिले. गेल्या वर्षात दाम्पत्याने त्यांना लॅपटाॅपचे भाडे दिले नाही, तसेच लॅपटाॅप परत देण्याची मागणी केल्यानंतरही ते परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.