प्रभात वृत्तसेवा पुणे – बांगलादेशातून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय तसेच भारत-बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिका-याच्या लेखी परवानगीशिवाय भारतात घुसखोरी करून पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या महिला व पुरुष अशा १९ जणांना न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. पी. कुलकर्णी यांनी हा आदेश दिला. शबिना उर्फ साथी ईकलास मुल्ला यांच्यासह मिळून १९ (सर्व रा. बांग्लादेश) आरोपींना शिक्षा देण्यात आली असून, दंड न भरल्यास दहा दिवस सक्त मजुरी व परकीय कायदा कलम १४ (अ) (अ) (ब) अन्वये दोन वर्ष चार महिने पंधरा दिवस सक्त मजुरी देण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. शिक्षा भोगल्यानंतर सर्वांची बांगलादेशला पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद हजारे यांनी बाजू मांडली.हे १९ आरोपी बांगलादेशातून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारत-बांगलादेश सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून रात्रीच्या वेळी लपतछपत घुसखोरी करून पुण्यात अनधिकृतपणे वास्तव्य करताना आढळले. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व साबित करणारे कोणतेही दस्ताऐवज नसल्याचे समोर आले असून, ते बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोपींवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फरासखाना पोलीस स्टेशनचे (सध्या छत्रपती संभाजीनगर) पोलीस निरीक्षक(गुन्हे) मंगेश जगताप ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे ) उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा महानवर, कोर्ट अंमलदार सहायक पोलीस फौजदार (प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी) संतोष शिंदे यांनी काम पाहिले. वॉरंट समन्स शिरीष कुमार शिंदे सहाय्यक पोलीस फौजदार व नितीन दुधाळ पोलीस हवालदार यांनी बजावले.