प्रभात वृत्तसेवा पुणे – सख्ख्या भावाला खाकी वर्दी मिळवून देण्यासाठी ‘मुन्नाभाई’गिरी करणे पोलीस उपनिरीक्षकाला महागात पडले आहे. त्याने चक्क ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाप्रमाणे ‘डमी’गिरीचा प्रयोग केल्याचे उघड झाला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील या उपनिरीक्षकाने २०१६ मध्ये थेट भावाच्या जागी बसून लेखी परीक्षा दिली. अखेर नऊ वर्षांनी हा बनाव अखेर उघडकीस आला असून, या उपनिरीक्षकाला पुणे अटक केली असून, तीन दिवस पोलीस कोठडीचा आदेश दिला.सुप्पडसिंग शिवलाल गुसिंगे असे त्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याच्यासह भाऊ गजानन शिवलाल गुसिंगे (दोघे रा. रा. कौचलवाडी, रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना) याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांत तोतयागिरी, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे या भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार परीक्षांमधील गैरप्रकारास प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ एप्रिल २०१६ रोजी सकाळी सहा वाजता शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घडली. २०१६ मधील भरती प्रक्रियेत आरोपी गजानन गुसिंगे सहभागी झाला. त्याने पाच व सहा एप्रिल २०१६ रोजी मैदानी चाचणी परीक्षा दिली. त्यानंतर २४ एप्रिलला लेखी परीक्षेसाठी स्वतःऐवजी ‘डमी’ व्यक्तीला बसविले. त्यासाठी वट ओळखपत्रेही तयार केली. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी गजाननचा आणि तोतया व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेकडून या दोघांचा शोध सुरू होता. या लेखी परीक्षेच्या चित्रीकरणात गजाननच्या जागी लेखी परीक्षा देणारी तोतया व्यक्ती म्हणजेच गजाननचा सख्खा भाऊ सुप्पडसिंग असल्याचे एका साक्षीदाराने सांगितले. दरम्यानच्या काळात सुप्पडसिंग महाराष्ट्र पोलिसांत भरती झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून माहिती मागविली असता, सुप्पडसिंगची २०२३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणूक झाली असून, तो सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत नियुक्त असल्याची माहिती मिळाली. त्याची खातरजमा झाल्यावर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज्य राखीव दल गट क्रमांक सात येथून आरोपी सुप्पडसिंगला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. आरोपी गजाननचा शोध सुरू आहे. आरोपींनी बनावट ओळखपत्र कुठून तयार केली, याबाबत तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी सहायक निरीक्षक दादासाहेब पाटील आणि सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी केली.