Winter Health: थंडीचे दिवस सुरू होताच वातावरणातील गारठा वाढतो आणि त्याचा परिणाम आरोग्यावर दिसू लागतो. सर्दी, खोकला, ताप, घसा बसणे यांसारख्या तक्रारी या काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होतात. अनेकदा अशा किरकोळ आजारांसाठी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी घरगुती उपायांचा आधार घेतला जातो. यामधील सर्वात सोपा आणि हमखास केला जाणारा उपाय म्हणजे गरम पाण्याची वाफ घेणे. मात्र केवळ साधी वाफ न घेता काही औषधी घटकांचा वापर केल्यास तिचा अधिक फायदा होऊ शकतो. घरच्या घरी सहज उपलब्ध असलेल्या तुळस, दालचिनी, लवंग आणि काळीमिरी या घटकांचा वापर करून औषधी वाफ तयार करता येते. यासाठी तुळशीच्या पानांची पावडर, दालचिनी पावडर, लवंगाची पावडर आणि काळीमिरीची पूड प्रत्येकी एक टेबलस्पून प्रमाणात घ्यावी. सर्वप्रथम एका भांड्यात पाणी उकळवून घ्यावे आणि गॅस बंद करून ते बाजूला ठेवावे. त्यानंतर या सर्व पावडरी स्वच्छ सुती कापडात घेऊन घट्ट गाठ मारून छोटीशी पोटली तयार करावी. ही पोटली उकळत्या पाण्यात सोडल्यावर त्यातील औषधी घटक पाण्यात मिसळतात आणि सुगंधी वाफ तयार होते. या वाफेचा श्वास घेतल्यास श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होते. तुळस, दालचिनी, लवंग आणि काळीमिरी यामध्ये असलेले नैसर्गिक औषधी गुणधर्म सर्दी-खोकला कमी करण्यास, घसा बसण्याची समस्या दूर करण्यास आणि शरीराला आराम देण्यास उपयोगी ठरतात. थंडीच्या दिवसांत नियमितपणे अशी औषधी वाफ घेतल्यास सर्दी-खोकल्याच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते. मात्र लक्षणे तीव्र असल्यास किंवा ताप वाढत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.