What Is White Noise: सध्या हिवाळ्याचा काळ सुरू असून या दिवसांत अनेकांना जास्त आणि गाढ झोप लागते. झोप अधिक चांगली लागण्यासाठी काही गोष्टी उपयोगी ठरतात. त्यापैकीच एक म्हणजे व्हाइट नॉइज. झोपताना खोलीत पंख्याचा किंवा रेडिओचा हलका “श्श्श” असा आवाज येत राहतो, तोच व्हाइट नॉइज मानला जातो. हा आवाज आजूबाजूचा त्रासदायक गोंगाट कमी करून झोपेसाठी मदत करतो. व्हाइट नॉइज म्हणजे सतत आणि मंद स्वरात येणारा आवाज. यामुळे मेंदूला शांतता मिळते आणि झोप लागण्यास मदत होते. झोपेत वारंवार व्यत्यय येत नाही आणि मन अधिक स्थिर राहते. फक्त झोपेसाठीच नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही व्हाइट नॉइज उपयुक्त आहे. संशोधनानुसार, कमी पातळीवरील आवाज एकाग्रता आणि लक्ष वाढवतो. सुमारे ४५ डेसिबल इतकी हलकी व्हाइट नॉइज विशेषतः तरुणांमध्ये स्मरणशक्ती, लक्ष आणि विचारशक्ती सुधारण्यास मदत करते. फ्लॅट, रुग्णालय किंवा जास्त आवाज असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या सुमारे ३८ टक्के लोकांना व्हाइट नॉइजमुळे लवकर झोप लागते. नवजात आणि लहान मुलांसाठीही व्हाइट नॉइज फायदेशीर मानली जाते. या आवाजामुळे बाळ शांत राहते आणि गाढ झोप घेते. रात्री वारंवार जाग येत नाही. तसेच ऑटिझम किंवा ADHD असलेल्या मुलांसाठीही व्हाइट नॉइज उपयुक्त ठरू शकते. झोप सुधारल्यामुळे लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. याशिवाय, स्किझोफ्रेनिया, डिप्रेशनसारख्या मानसिक समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठीही व्हाइट नॉइज उपयोगी ठरते. ती मेंदूवरील अतिरिक्त ताण कमी करण्यास मदत करते आणि मानसिक शांतता देते.