Raw Mango: उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे आणि उष्ण वाऱ्यांमुळे अनेकांना उष्माघात, थकवा, डिहायड्रेशन आणि पचनाच्या समस्या जाणवतात. अशा वेळी कच्ची कैरी म्हणजेच कच्चा आंबा शरीरासाठी मोठा आधार ठरू शकतो. चवीनं आंबट आणि चटपटीत असलेली कैरी फक्त लोणचं, चटणी किंवा पन्हं बनवण्यासाठीच उपयोगी नसून आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानली जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कच्च्या आंब्यामध्ये शरीराला आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असतात. उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. अशावेळी कच्ची कैरी शरीराला नैसर्गिकरीत्या हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील पाण्याचं संतुलन राखतात आणि उष्णतेमुळे येणारा थकवा कमी करतात. (Raw Mango) कच्ची कैरी पचनासाठीही फायदेशीर आहे. उन्हाळ्यात अनेकांना अॅसिडिटी, बद्धकोष्ठता किंवा भूक न लागण्याच्या तक्रारी होतात. कच्च्या आंब्यातील पाचन एन्झाइम्स अन्न नीट पचवण्यास मदत करतात. त्यामुळे पोट हलकं राहतं आणि पचनसंस्था चांगली कार्यरत राहते. Raw Mango याशिवाय कच्च्या आंब्यात फायबरचं प्रमाणही चांगलं असतं. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. नियमित प्रमाणात कच्ची कैरी खाल्ल्यास हृदयाशी संबंधित काही समस्या टाळण्यासही मदत होऊ शकते. कच्च्या आंब्यात प्रीबायोटिक्सदेखील असतात. हे घटक आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करण्यास मदत करतात. त्यामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. Raw Mango कच्च्या आंब्याचं सेवन अनेक प्रकारे करता येतं. उन्हाळ्यात कैरीचं पन्हं हा सर्वात लोकप्रिय पर्याय मानला जातो. याशिवाय कैरीची चटणी, कोशिंबीर किंवा थोडं मीठ, काळं मीठ आणि जिरं घालूनही ती खाता येते. अशा पदार्थांमुळे शरीराला ताजेतवाने वाटतं आणि उष्णतेपासून आराम मिळतो. मात्र कोणतीही गोष्ट अति प्रमाणात खाणं नुकसानकारक ठरू शकतं. कच्च्या आंब्याचं जास्त सेवन केल्यास काही लोकांना अॅसिडिटी किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. विशेषतः गर्भवती महिला किंवा इतर आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच कच्च्या आंब्याचा आहारात समावेश करावा. उन्हाळ्यात शरीर थंड, ताजं आणि निरोगी ठेवण्यासाठी कच्ची कैरी हा एक उत्तम आणि नैसर्गिक पर्याय ठरू शकतो. योग्य प्रमाणात सेवन केल्यास ती आरोग्यासाठी खरोखरच फायदेशीर आहे.