बीजिंग: वेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईमुळे आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ओलीस ठेवल्याच्या घटनेमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर चीनने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेवर निशाणा साधला आहे. “जगात सध्या एकतर्फी दादागिरी वाढत असून आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले जात आहे,” अशा शब्दांत जिनपिंग यांनी आपला संताप व्यक्त केला. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, जिनपिंग यांनी या घटनेचा उल्लेख जागतिक शांततेसाठी धोका असा केला आहे. ते म्हणाले की, “आज जग अशा बदलांमधून आणि उलथापालथीच्या काळातून जात आहे, जे गेल्या शतकात कधीही पाहिले गेले नव्हते. काही देशांची हुकूमशाही प्रवृत्ती आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला कमकुवत करत आहे.” आयर्लंडचे पंतप्रधान मायकल मार्टिन यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडली. ‘सत्तेच्या बळावर नियमांची पायमल्ली’ चीनने अमेरिकेचे नाव न घेता सुनावले की, प्रत्येक देशाला स्वतःचा विकास मार्ग निवडण्याचा अधिकार आहे आणि मोठ्या शक्तींनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सन्मान करायला हवा. “सत्तेच्या जोरावर इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे आणि व्यवस्था बिघडवणे हे संयुक्त राष्ट्रांच्या (UN) सनदेच्या विरोधात आहे,” असेही जिनपिंग यांनी स्पष्ट केले. चीनला मोठा धोरणात्मक धक्का वेनेझुएलातील ही उलथापालथ बीजिंगसाठी एक मोठा धोरणात्मक आणि आर्थिक धक्का मानली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे. ह्यूगो शावेज यांच्या काळापासून वेनेझुएला हा चीनचा अत्यंत विश्वासू मित्र आणि तेलाचा प्रमुख स्त्रोत राहिला आहे. चीनने गेल्या दोन दशकांत वेनेझुएलामध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. अमेरिकेचे निर्बंध असूनही चीन वेनेझुएलाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत होता. लॅटिन अमेरिकेत अमेरिकेच्या प्रभावाला रोखण्यासाठी चीनने नेहमीच मादुरो सरकारला पाठबळ दिले होते. मादुरो यांच्या सुटकेची मागणी चीनने यापूर्वीच मादुरो आणि त्यांच्या पत्नीला “तातडीने” सोडून देण्याची मागणी केली आहे. एका सार्वभौम राष्ट्रावर उघडपणे लष्करी बळाचा वापर करणे ही आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मूलभूत तत्त्वांची पायमल्ली असल्याचे चीनने म्हटले आहे. मादुरो सरकार कोसळल्याने दक्षिण अमेरिकेतील चीनच्या प्रभावावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.