ढाका : ढाका विद्यापीठातील बंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांचे नाव असलेल्या सभागृहाचे नाव आता बदलून शरीफ ओस्मान हदी असे करण्यात आले आहे. हदी हा गेल्या वर्षी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील एक प्रमुख युवा नेता होता आणि अलिकडेच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि गुरुवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. विद्यार्थ्यांच्या संघटनेने शनिवारी या सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील शेख मुजीबूर रेहमान यांच्या नावाची पाटी काढली आणि त्या जागेवर शहीद शरीफ ओस्मान हदी हॉल अशी पाटी लावली, असे ढाक्यातून प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्राने म्हटले आहे. हदी याच्यावर १२ डिसेंबरला गोळीबार झाला होता. ढाकाच्या मध्यवस्तीतल्या बिजोयानगर भागात निवडणुकीचा प्रचार करत असताना काही अज्ञात बुरखाधारी व्यक्तीने त्याच्यावर हा गोळीबार केला होता. त्याच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू होते. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण बांगलादेशात असंतोष उफाळून आला आणि जाळपोळ आणि तोडफोडही झाली होती. काही विद्यार्थ्यांनी सभागृहाच्या मुख्य इमारतीमध्ये असलेल्या शेख मूजीबूर रेहमान यांच्या भित्तीशिल्पांवर रंगांनी घोषणाही रंगवल्या आहेत. क्रेनच्या सहाय्याने या सभागृहाची पाटी सकाळी हटवण्यात येणार असल्याचे ढाका विद्यापीठाच्या सेंट्रल स्टुडंटस युनियनचा सचिव मुसादिक इब्न मोहम्मद याने म्हटले होते. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या सभागृहाचे नाव बदलण्यात येत असल्याचे कुलगुरू मुस्लिमर रहमान यांनी माध्यमांना सांगितले.