Grok AI: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’चा (पूर्वीचे ट्विटर) एआय चॅटबॉट ‘ग्रोक’ (Grok) सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ग्रोकद्वारे लैंगिक स्वरूपाचे आणि आक्षेपार्ह फोटो तयार केले जात असल्याच्या तक्रारींनंतर, ब्रिटनच्या ‘ऑफकॉम’ (Ofcom) या माध्यम नियामक संस्थेने ‘एक्स’ विरुद्ध अधिकृत चौकशी सुरू केली आहे. ब्रिटनच्या ‘ऑनलाइन सुरक्षा कायद्या’चे (Online Safety Act) उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? गेल्या काही दिवसांपासून ‘ग्रोक’ एआयचा वापर करून महिला आणि मुलांचे अश्लील तसेच विनासंमती तयार केलेले आक्षेपार्ह फोटो (Deepfakes) सोशल मीडियावर शेअर केले जात असल्याचे समोर आले होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत ऑफकॉमने इलॉन मस्क यांच्या कंपनीला ९ जानेवारीपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. कंपनीने दिलेले उत्तर आणि उपलब्ध पुराव्यांची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर, आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनच्या विज्ञान, नाविन्य आणि तंत्रज्ञान मंत्री लिझ केंडल यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्या म्हणाल्या, “महिला आणि मुलांच्या फोटोंशी छेडछाड करणे हे अत्यंत घृणास्पद आहे. जर ‘एक्स’ने ब्रिटीश कायद्यांचे पालन करण्यास नकार दिला, तर या प्लॅटफॉर्मवर ब्रिटनमध्ये बंदी घालण्याचे अधिकार आमच्याकडे आहेत आणि आम्ही त्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देऊ.” या एआय तंत्रज्ञानामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, भारतासह अनेक देशांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. इंडोनेशियासारख्या देशांनी तर ‘एक्स’वर तात्पुरती बंदीही घातली आहे. दुसरीकडे, इलॉन मस्क यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत या कारवाईला विरोध केला आहे. ऑफकॉम काय तपासणार? ग्रोकमुळे बेकायदेशीर मजकूर पसरण्याचा धोका किती आहे? आक्षेपार्ह आणि विनासंमती तयार केलेले फोटो रोखण्यासाठी कंपनीने काय उपाययोजना केल्या? लहान मुलांना अश्लील सामग्रीपासून वाचवण्यासाठी ‘एज व्हेरिफिकेशन’ (वयोगट तपासणी) प्रक्रिया प्रभावी आहे का? या चौकशीच्या निकालावर ‘एक्स’चे ब्रिटनमधील भविष्य अवलंबून असणार आहे.