Donald Trump: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आता अधिकच भीषण स्वरूप धारण करत असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेसाठी मोठे पाऊल उचलले आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली. “हे युद्ध म्हणजे केवळ रक्ताचा सडा असून, आता ते थांबवणे आवश्यक आहे,” असे ठाम प्रतिपादन ट्रम्प यांनी यावेळी केले. पुतिन यांच्याशी आज किंवा उद्या भेट पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी आगामी रणनीती स्पष्ट केली. ते म्हणाले, “माझी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. आता आमचे शिष्टमंडळ आज किंवा उद्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहे.” या युद्धात ड्रोन हल्ल्यांमुळे दर आठवड्याला हजारो निष्पाप लोकांचा बळी जात असल्याचे सांगत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. शांतता करारासाठी प्रयत्न सुरू ट्रम्प यांनी दावा केला की, रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) थांबवण्यासाठी ते एका कराराच्या जवळ पोहोचले आहेत. मात्र, दोन्ही देशांमधील द्वेष इतका खोलवर आहे की तो करारासाठी अडथळा ठरत आहे. “दोन्ही बाजूला खूप मोठा मनुष्यसंहार झाला आहे. लाखो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी शांतता प्रस्थापित करणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे,” असेही त्यांनी नमूद केले. झेलेन्स्की यांच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी एक महत्त्वाची बाब निदर्शनास आणून दिली. त्यांच्या मते, यापूर्वी अनेकवेळा समझोत्याचे प्रयत्न झाले, मात्र झेलेन्स्की यांनी ते स्वीकारले नाहीत. हे संतुलन राखणे कठीण असल्याचे त्यांनी मान्य केले. दुसरीकडे, झेलेन्स्की यांनी युद्धोत्तर सुरक्षा आणि आर्थिक मदतीबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत कायदेशीर दस्तऐवज अंतिम करण्यावर भर दिला आहे. रशिया आणि युक्रेनमधील या ऐतिहासिक संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी यशस्वी होणार का, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा – Board of Peace: दावोसमध्ये ‘बोर्ड ऑफ पीस’चा श्रीगणेशा; ट्रम्प यांची शांततेसाठी स्वाक्षरी