पेशावर : गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून पाकिस्तानमधून तब्बल १० लाख अफगाणी नागरिक मायदेशी परतले आहेत, असे पाकिस्तानमधील अधिकृत डाटावरून उघड झाले आहे. ही अधिकृत आकडेवारी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. पाकिस्तानमधून अफगाणी शरणार्थ्यांना मायदेशी परत पाठवण्याची मोहिम २०२३ पासून सुरू झाली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये सरकारने बेकायदेशीर परदेशी लोकांच्या स्वदेशी परतीची योजना सुरू केली, त्यामुळे अफगाणिस्तानातील लोक मोठ्या प्रमाणात परतले. पाक सरकारने देशातील सर्व बेकायदेशीर शरणार्थ्यांना देशाबाहेर हाकलून देण्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेअंतर्गत एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत प्रांतातील वेगवेगळ्या सीमा बिंदूंवरून एकूण ९,८८,८१२ अफगाण नागरिकांना अफगाणिस्तानात परत पाठवण्यात आले आहे, असे खैबर पख्तूनख्वा गृह विभागाने म्हटले आहे. याशिवाय पाकिस्तानात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ६,८६,७७२ अफगाण नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२३ आणि एप्रिल २०२५ मध्ये अनुक्रमे लागू करण्यात आलेल्या योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात कागदपत्रे नसलेल्या अफगाण आणि अफगाण नागरिकत्व कार्ड धारकांना परत पाठवण्यात आले. तिसरा टप्प्यात पीओआर धारकांना परत पाठवले जाणार आहे. हा टप्पा सप्टेंबर २०२५ मध्ये सुरू झाला.