ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांची आज बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. खालिदा झिया यांच्या मृत्यूनंतर पक्षाचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. या पदावर तारिक रहमान यांची नियुक्ती करण्याचा निर्णय बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या स्थायी समितीने घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. ढाका येथे झालेल्या या बैठकीनंतर बीएनपीचे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तारिक रहमान तब्बल १७ वर्षे ब्रिटनमध्ये वास्तव्यास होते. खालिदा झिया यांच्या आजारपणाच्या निमित्ताने २५ डिसेंबर रोजी त्यांनी आपला विजनवास समाप्त केला आणि ते बांगलादेशात परतले. बांगलादेशात आगामी काळात होणाऱ्या संसदीय निवडणुकांमध्ये तारिक रहमान यांना बीएनपीच्यावतीने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता आहे. आवामी लीग पक्षाला निवडणुकीत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये बीएनपी हा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता बळावली आहे.