किव्ह : अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शांतता चर्चांना गती देण्याचे प्रयत्न सुरू असतानाच रशियाने युक्रेनच्या वीज पुरवठा व्यवस्थेवर पुन्हा एकदा मोठा हवाई हल्ला केला आहे. अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी रशियाने ३०० हून अधिक ड्रोन तसेच बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करून युक्रेनवर बॉम्बहल्ला केला. किव्हचे महापौर विटाली क्लित्स्को यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यामुळे राजधानीतील सुमारे ५,६०० अपार्टमेंट इमारतींचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. युक्रेन सध्या अत्यंत थंड हिवाळ्याचा सामना करत असून, काही भागांत तापमान उणे २० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. दरम्यान, युक्रेनियन शिष्टमंडळ अमेरिकेत दाखल झाले असून, रशियाचे सततचे हल्ले शांतता प्रक्रियेला कसे बाधा आणत आहेत. हे अमेरिकन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणणे हा त्यांचा उद्देश आहे. झेलेन्स्की यांच्या मते, युद्धोत्तर सुरक्षा हमी आणि आर्थिक पुनर्बांधणीसंदर्भातील प्रस्तावांवर चर्चा सुरू आहे. युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, २७ क्षेपणास्त्रे आणि ३१५ ड्रोन पाडण्यात आले, मात्र काही हल्ल्यांमुळे वीज पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.