तिजोरीचा मालक आपलाच-चंद्रकांत पाटील राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत, कुणाला निधी द्यायचा आणि कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य नुकतंच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केलं होतं. त्यावरुन आता चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावलाय. त्यांनी याविषयी बोलताना राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे असं वक्तव्य केलंय. तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असंही ते म्हणाले. गडहिंग्लजमधील प्रचारसभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्व् भूमीवर सर्वच पक्ष एकमेकांना कानपिचक्या देताना दिसून येतायत. =================== आम्ही बांगड्या घातलेल्या नाही, मर्द आहोत भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीचे सागर करणे आणि पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे माजी खासदार मधुकर कुकडे यांच्या पुतण्याने भाजपातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीवर मैदानात उतरलेत. याठिकाणी पक्षाच्या उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभेत प्रफुल्ल पटेल यांनी बंडखोर गभने आणि कुकडे यांच्यावर निशाणा साधला.आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाही. आम्हाला ही माहिती आहे, आम्ही मर्द आहे…आपण कोणाला भितो का? टाळी मारू नका, व्होट द्या. भरकटलेला परत येईल पण त्याच्या मागे आपण जायचं नाही असं म्हणत त्यांच्यावर टीका केलीय. ======================= तो निधी यांनी घरी ठेवला होता का? – बोर्डीकर नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. अशातच जिंतूरमध्ये आयोजित सभेत बोलताना अजित पवारांनी जिंतूरचा विकास हा बारामती आणि पिंपरी चिंचवडच्या धरतीवर करू, हा विकास करणे म्हणजे येड्या गबाळ्याचे काम नसल्याची टीका पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर केली होती. याच टीकेला बोर्डीकरांनी उत्तर दिलंय. दादांनी बारामतीला दहा रुपये लागत असतील तर शंभर रुपये निधी दिलेला आहे. त्यामुळे बारामतीचा विकास होणारच ना, असाच विकास इतर नगर पालिकांचा का झाला नाही? जिंतूर नगर परिषदेवर त्यांच्याच राष्ट्रवादीची सत्ता होती मग जर अजित पवारांनी निधी दिला असेल तर यांनी तो निधी घरी ठेवला होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. ====================== प्रत्येक जिल्ह्यात प्राणिसंग्रहालय – वनमंत्री राज्यात मानव-वन्यजीव संघर्षात सातत्याने वाढ होतीय. पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांचे तर विदर्भात वाघाचे हल्ले आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. अशा वेळी या संघर्षात जेरबंद केलेले वन्यप्राणी ठेवायचे कुठे, असाही प्रश्न आहे. त्यावर पर्याय म्हणून आता प्रत्येक जिल्ह्यात प्राणिसंग्रहालय स्थापन करण्याचा विचार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलंय. त्यासोबतच हे प्राणी संग्रहालय वन खात्याच्या जमिनीवरच उभारले जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.नागपूरमध्ये आयोजित आढावा बैठकीत त्यांनी हि माहिती दिली. =================== विखे पाटील विरुद्ध कोल्हे सुप्त संघर्ष अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे पाटील विरुद्ध कोल्हे असा सुरू असलेला सुप्त संघर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही दिसून आला. समोरच्या उमेदवाराला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं असं स्नेहलता कोल्हे यांनी म्हटलं. तर त्यावर राधाकृष्ण विखेंनीहीउत्तर दिलं. वक्तव्य करताना संयम ठेवला पाहिजे, कोपरगावमध्ये भाजपचाच उमेदवार निवडून येणार याची ग्वाही देतो असं विखे म्हणाले. कोपरगाव नगरपालिका निवडणूक ही महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रंगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपने प्रचाराचा शुभारंभ केला. ==================== पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण उत्तर प्रदेशमधील अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. राम मंदिराच्या शिखरावरील भव्य ध्वज 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा आहे. या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवतांसह देशभरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होते. या ध्वजावर भगवान श्री रामांच्या तेजस्वी आणि शौर्याचं प्रतीक असलेल्या तेजस्वी सूर्य तसंच कोविदार वृक्षाच्या प्रतिमेसह “ओम” लिहिलेलं आहे. या सोहळ्यासाठी अयोध्या शहरातील अनेक भागात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. दरम्यान , हा दिव्या सोहळा पाहण्यासाठी देशभरातून अनेक भाविक अयोध्या नगरीत दाखल झाले होते. ================== इथिओपियाच्या ज्वालामुखीचा भारतापर्यंत भडका इथिओपियाच्या हेले गुबिन ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेला राखेचा मोठा ढग भारतात पोहोचला आहे, ज्याचा दिल्ली, राजस्थान आणि उत्तर भारतातील मोठ्या भागांवर परिणाम झालाय. राजधानी दिल्लीच्या अनेक भागात विषारी धुकं पसरलंय. ज्वालामुखीच्या राखेमुळे, अकासा एअर, इंडिगो आणि अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणाचे मार्ग बदलण्यात आलेत, तर काही रद्दही करण्यात आल्या आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान कंपन्यांना इशारा जारी केला आहे, शास्त्रज्ञांच्या मते, पृष्ठभागावरील हवेच्या गुणवत्तेवर फारसा परिणाम होणार नाही, परंतु उच्च उंचीवरील उड्डाणे धोक्यात राहतील. ================= प्रत्येक गोष्टीवर पूर्ण टॅरीफ द्यावा लागेल-ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा त्यांच्या टॅरिफ धोरणाचं कौतुक केलंय. त्यांनी अमेरिका आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे कमवत असून हे उत्पन्न विक्रम मोडत आहे. ट्रम्प यांनी परदेशातून आयात केलेल्या वस्तूंवर टॅरिफ, एक प्रकारचा कर लादला तेव्हा अमेरिकेला “शेकडो अब्ज डॉलर्स” चा फायदा झाला आणि हा फायदा आणखी वेगाने वाढणार असल्याचा दावा केलाय. तसंच पूर्वी अनेक परदेशी कंपन्या टॅरिफ टाळण्यासाठी त्यांच्या गोदामांमध्ये अतिरिक्त वस्तू भरत होत्या. आता त्यांचा अतिरिक्त साठा संपलाय त्यामुळं आता त्यांना प्रत्येक गोष्टीवर पूर्ण टॅरीफ द्यावा लागेल ज्यामुळं अमेरिकेचा महसूल लक्षणीयरीत्या वाढेल असं ट्रम्प यांनी म्हटलंय . ================= ‘जय’ची ‘वीरु’साठी भावुक पोस्ट तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या बॉलिवूडच्या ही-मॅन धर्मेंद्र यांनी काल अखेरचा श्वास घेतला. धमेंद्र यांचे जिवलग मित्र महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केलीये. रात्री अडीच वाजता शेअर केलेल्या पोस्टमधून त्यांनी “एक आणखी दिग्गज आपल्याला सोडून गेलाय.. तो जणू एक मैदान रिकामं करून गेलाय.. मागे अशी शांतता ठेवून गेला जी सहन करणं अशक्य आहे.” असं म्हणत त्यांचं दुःख व्यक्त केलंय. त्यांचं स्मितहास्य, त्यांचा चार्म आणि त्यांची आपुलकी, जे त्यांच्या आसपास येणाऱ्या प्रत्येकाला जाणवलं. आपल्या आसपास आता एक पोकळी निर्माण झाली आहे जी कायमची राहील.असं त्यांनी म्हटलं. ================ स्मृती मानधना नाही तर पलाशने लग्न पुढे ढकललं भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा 23 नोव्हेंबरला होणारा विवाह सोहळा अचानक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय स्मृतीने की पलाशने? याबद्दलची मोठी माहिती आता समोर आली आहे. पलाशची आई अमिता यांनी खरा प्रसंग उघड सांगितलाय. अमिता मुच्छल यांनी, “स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याचे समजताच पलाशने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिलीय. स्मृतीच्या वडिलांची तब्येत आधी ठीक होऊ दे, मग आपण लग्न करू.’ असं पलाशने म्ह्टल्याचं अमित यांनी सांगितलं. स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांतच पलाशलाही अस्वस्थतेमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली.