Ramesh Chandra Sen : बांगलादेशातील एक प्रमुख हिंदू नेते आणि माजी मंत्री रमेश चंद्र सेन (Ramesh Chandra Sen) यांचे शनिवारी कोठडीत गंभीर आजारी पडल्यानंतर निधन झाले. मदत करण्याचा स्वभाव आणि निष्कलंक राजकीय कारकिर्दीसाठी ओळखले जाणारे सेन यांच्या मृत्यूमुळे अवामी लीगच्या वरिष्ठ नेत्यांना आणि अटकेत असलेल्या माजी मंत्र्यांना दिलेल्या वागणुकीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रमेश चंद्र सेन हे बांगलादेशचे माजी जलसंपदा मंत्री आणि पाच वेळा खासदार होते, त्यांनी २०२४ मध्ये निवडणूक जिंकली होती. सेन यांना सकाळी ९.१० वाजता दिनाजपूर जिल्हा कारागृहातून दिनाजपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात नेण्यात आले आणि सकाळी ९:२९ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. सेन ८५ वर्षांचे होते आणि त्यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. त्यांना माजी मंत्र्याला मिळणाऱ्या सुविधा पुरवल्या जात नव्हत्या. शेख हसीना यांचे सरकार पायउतार झाल्यानंतर अवामी लीगच्या नेत्यांविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने आरोप केले गेले गेले होते. सेन यांच्यावरही खुनासह तीन आरोप लावण्यात आले होते. ऑगस्ट २०२४ मध्ये सेन यांना गुरांसाठी वापरल्या जाणाऱ्या दोरीने हात बांधून पोलिसांकडे नेले जात असतानाचे फोटो सोशल मीडियावर आले. नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी झालेल्या हल्ल्यांनंतर आवामी लीगचे बहुतेक नेते पळून गेले. तेव्हा सेन यांना त्यांच्या घरातच ठेवण्यात आले होते. कारण आपण काहीही चुकीचे केलेले नाही, याची त्यांना खात्री होती.