वॉशिंग्टन : अमेरिकेतील मिसिसिपी राज्यातील क्ले काउंटी भागात शुक्रवारी झालेल्या भीषण गोळीबारात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या या घटना तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहित समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत शोधमोहीम राबवली आणि संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या. आता कोणताही धोका नाही: शेरिफ एडी स्कॉट क्ले काउंटीचे शेरिफ एडी स्कॉट यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या कारवाईची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “संशयित आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असून समुदायासाठी आता कोणताही धोका उरलेला नाही. मी सर्वांना विनंती करतो की, या घटनेतील मृत आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करा.” शेरिफ विभागाने अद्याप मृतांच्या आकड्याबाबत अधिकृत सविस्तर पत्रक जारी केलेले नाही, मात्र स्थानिक यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या सहा आहे. ईशान्य मिसिसिपीमध्ये असलेल्या क्ले काउंटीची लोकसंख्या सुमारे २०,००० असून या शांत परिसरात झालेल्या हिंसेमुळे नागरिक हादरले आहेत. या घटनेमागील नेमका हेतू काय होता आणि गोळीबार नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत.