इस्लामाबाद : इम्रान खान यांच्या डोळ्यांना गंभीर आजार झाला असून जर योग्य ते उपचार वेळेवर झाले नाहीत, तर इम्रान यांना कायम स्वरुपी अंधत्वन येण्याचा धोका आहे, असे पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाने म्हटले आहे. अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणी इम्रान खान यांना अदियाला तुरुंगात ठेवले असून ऑगस्ट २०२३ पासून वेगवेगळ्या प्रकरणात त्यांना तुरुंगातच ठेवण्यात आले आहे. इम्रान खान यांच्या डोळ्यांच्या आजारपणाबाबत खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेली माहिती पीटीआयने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. खान यांच्या उजव्या डोळ्याला सेंट्रल रेटिनल व्हेन ऑक्लूजन झाले आहे. यामुळे डोळ्यांच्या आतील नसा बंद होऊ शकतात. डॉक्टरांच्या मते हा विकार अत्यंत संवेदनशील आणि गंभीर आहे. जर वेळेवर उपचार न झाल्यास यामुळे कायमचे अंधत्व येण्याचा धोका असतो. हे उपचार तुरुंगाच्या आवारात केले जाऊ शकत नाहीत. त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते आणि अत्याधुनिक उपचार सुविधा आवश्यक असतात, असे पीटीआयने म्हटले आहे. इम्रान खान यांना ऑक्टोबर २०२४ मध्ये डॉक्टरांनी तपासले होते. त्यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही इम्रान खान यांचे डॉक्टर त्यांची तपासणी करू शकलेले नाहीत, असेही पीटीआयने म्हटले आहे. कच्च्या कैद्यांच्या आरोग्याची काळजी न घेणे हे मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे. इम्रान खान यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी केली जावी, या मागणीसाठी केलेली याचिका ऑगस्ट २०२५ पासून प्रलंबित आहे. जाणीवपूर्वक या याचिकेवर सुनावणी केली गेलेली नाही, असा आरोपही पीटीआयने केला आहे.