इस्लामाबाद : इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांना तोशखाना २ प्रकरणी १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याच्या दिसऱ्याच दिवशी हे आंदोलनाचे आवाहन करण्यात आले आहे. अदियाळा तुरुंगात वकिलांशी बोलताना इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना देशव्यापी आंदोलनासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. इम्रान खान यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबतचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र इम्रान खान तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या अकाऊंटवरून हे निवेदन सोशल मीडियावर कोणी पोस्ट केले, हे समजू शकलेले नाही. खैबर पख्तुनख्वाच्या मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांना मी रस्त्यावरील आंदोलनासाठी तयार राहण्याचा संदेश पाठवला आहे. सर्व देशाला आपल्या हक्कांसाठी उभे राहमे गरजेचे आहे. संघर्ष हीच आराधना आहे. पाकिस्तानींच्या स्वातंत्र्यासाठी मी हौतात्म्य देखील पत्करायला तयार आहे, असे इम्रान खान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आपल्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत नाही. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यास आपण वकिलांना सांगितले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या तीन वर्षात आपल्याविरोधात बिनबुडाचे निर्णय आणि शिक्षा सुनावल्या गेल्या आहेत. तोशखाना २ प्रकरणाचा निकालही आश्चर्य वाटावा असा नाही. हा निर्णय घाईघाईने दिलेला आणि कोणत्याही पुराव्याविना दिलेला कायदेशीर प्रक्रिया पुर्ण न केलेला आहे. आपल्या वकिलांचे म्हणणेही ऐकून घेतले गेलेले नाही. आपला आणि पत्नी बुशरा बिबी यांचा मानसिक छळ केला जात आहे. एकांतवासात डांबले गेले आहे. पुस्तके, टिव्हीचा वापर आणि बैठकांवरही बंदी घातली गेली आहे, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्याविरोधात अनेक प्रकरणे दाखल असून काही प्रकरणात त्यांना दोषी ठरवून शिक्षाही सुनावण्यात आली आहे. तोशखाना २ हे प्रकरण सौदी सरकारकडून मिळालेल्या भेटवस्तूंशी संबंधित गैरव्यवहाराचे प्रकरण आहे.