वॉशिंग्टन/तेहरान: इराणमधील वाढता जनक्षोभ आणि तेहरानकडून मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर पाऊल उचलले आहे. अमेरिकेने आपले अण्वस्त्रधारी विमानवाहू युद्धपोत ‘USS अब्राहम लिंकन’ दक्षिण चीन समुद्रातून हटवून थेट मध्यपूर्वेतील ‘सेंट्रल कमांड’ (CENTCOM) क्षेत्रात तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेच्या या निर्णयामुळे संपूर्ण मध्यपूर्वेसह जागतिक राजकारणात खळबळ माजली असून, इराणमधील सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या सत्तेला ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इराणमध्ये क्रांतीची ठिणगी; ३,४०० हून अधिक मृत्यू डिसेंबर २०२५ पासून इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांनी रौद्र रूप धारण केले आहे. इराणचे चलन ‘रियाल’ कमालीचे घसरल्याने महागाईने उच्चांक गाठला असून सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. या आर्थिक संकटामुळे सुरू झालेल्या आंदोलनाचे आता देशव्यापी बंडात रूपांतर झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत ३,४२८ आंदोलकांचा मृत्यू झाला असून हजारो जणांना अटक करण्यात आली आहे. आंदोलक आता थेट सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या राजीनाम्याची आणि राजकीय स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. ट्रम्प यांचा ‘मास्टरस्ट्रोक’; पेंटागनची अधिकृत पुष्टी पेंटागनने दिलेल्या माहितीनुसार, ‘USS अब्राहम लिंकन’ स्ट्राइक ग्रुपमध्ये अनेक विनाशिका (Destroyers), क्रूझर आणि किमान एका अण्वस्त्रधारी पाणबुडीचा समावेश आहे. हा ताफा पुढच्या एका आठवड्यात इराणच्या सीमेजवळील पर्शियन आखात आणि होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ पोहोचेल. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यापूर्वीच इराणला इशारा दिला होता की, “आंदोलकांवरील अत्याचार थांबवा, अन्यथा इराणला गंभीर परिणाम भोगावे लागतील.” ही लष्करी तैनाती म्हणजे केवळ इराणवर दबाव निर्माण करणे नसून, सौदी अरेबिया, युएई आणि इस्रायल यांसारख्या मित्रराष्ट्रांना सुरक्षेचे आश्वासन देणारा अमेरिकेचा ‘मास्टरस्ट्रोक’ असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विदेशी शक्तींचा हात असल्याचा इराणचा आरोप दुसरीकडे, इराण सरकारने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, देशातील अशांततेसाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे. “हे आंदोलन विदेशी शक्तींनी पुरस्कृत केलेले षडयंत्र आहे,” असा दावा तेहरानने केला आहे. मात्र, अमेरिकेच्या युद्धनौका इराणच्या उंबरठ्यावर पोहोचणार असल्याने खामेनी प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.