ढाका : बांगलादेशातील कट्टरवाद्यांनी आज राजधानी ढाकामध्ये भारतीय उच्चायुक्तालयावर मोर्चा काढला. मात्र भारताने उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा मोर्चा अडवला. जुलै ओइक्याच्या बॅनरखाली हा मोर्चा काढला गेला होता आणि मोर्चा काढणारे निदर्शक भारतविरोधी घोषणा देत होते. भारताने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करावे यासारख्या मागण्या निदर्शक करत होते. हा मोर्चा ढाक्यातील रामपूर पूलाजवळून सुरू झाला होता. तेथेच भारताच्या उच्चायुक्तालयाचे कार्यालय आहे, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले. या मोर्चामुळे बहुतेक परदेशी दूतावास असलेल्या विदेशी कार्यालये असलेल्या या भागाच्या मुख्य रस्त्यावर वाहनांची वाहतूक तासन्तास बंद राहिली. मोर्चा पुढे जात असताना, पोलिसांनी अडथळ्यासाठी बॅरिकेड उभारले. पण निदर्शकांनी अडथळे तोडले पण पुढे आणखी मजबूत नाकाबंदी उभी केली गेली होती. तिथे निदर्शकांनी भारताविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली आणि हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. बांगलादेशविरुद्ध भारतीय प्रॉक्सी राजकीय पक्ष, मीडिया आणि सरकारी अधिकारी कट रचत आहेत, असा दावा निदर्शकांनी केला.राजनैतिक परिसराची सुरक्षा मजबूत करण्यासाठी विविध भागातील त्यांच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या आहेत, असे ढाका पोलिसांचे उपायुक्त नूर-ए-आलम सिद्दीक म्हणाले.