Emmanuel Macron : येत्या १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या एआय समिटसाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) भारत दौऱ्यावर येणार आहेत. मात्र त्याआधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेची (डीएसी) फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक होणार आहे. या बैठकीत संरक्षण खरेदीशी संबंधित प्रमुख प्रस्तावांवर विचार केला जाईल. संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने भारतातील एका प्रतिष्ठित इंग्रजी माध्यमाच्या संकेतस्थळाने वृत्त दिले आहे की, सर्वात महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे पुढील आठवड्यात फ्रान्सकडून ३२ लाख कोटी रुपयांच्या ११४ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी मिळणे हा आहे. यात तात्काळ उड्डाण करण्याच्या स्थितीत असणारी १८ राफेल विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव समाविष्ट आहे तर काही विमाने भारतात तयार केली जातील. या कराराअंतर्गत खरेदी केल्या जाणाऱ्या राफेल विमानांपैकी सुमारे ८०% विमाने भारतात तयार केली जातील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पांतर्गत, भारतीय हवाई दलाला ८८ सिंगल-सीटर आणि २६ टू-सीटर विमाने मिळतील, ज्यापैकी बहुतेक डसॉल्ट आणि भारतीय खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या सहकार्याने भारतात तयार केली जातील. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत भेटीदरम्यान हा करार अंतिम केला जाऊ शकतो. भारतीय हवाई दल सध्या सुमारे ३० फायटर स्क्वॉड्रन चालवते, जे त्यांच्या ४२ स्क्वॉड्रनच्या मंजूर क्षमतेपेक्षा खूपच कमी आहे. संरक्षण विश्लेषकांचा असा विश्वास आहे की पाकिस्तान आणि बांगलादेश तसेच पाकिस्तान आणि चीन यांच्यातील वाढत्या धोरणात्मक युतीमुळे भारताच्या प्रादेशिक सुरक्षा चिंता आणखी वाढल्या आहेत. करार पूर्ण झाल्यानंतर, भारतीय हवाई दलाकडे १५० राफेल विमानांचा ताफा असेल, तर भारतीय नौदलाकडे २६ विमाने असतील, ज्यामध्ये फ्रेंच विमानांच्या विमानवाहू आवृत्तीचा समावेश असेल.