Donald Trump : इराण बरोबरची चर्चा फिसकटल्यानंतर आता ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला मदत करणाऱ्या देशांनाही धमकावायला सुरुवात केली आहे. इराणला शस्त्रांची किंवा आर्थिक मदत केल्यास 50 टक्के आयात शुल्क लावण्यात येईल, अशी धमकी ट्रम्प यांनी चीनला दिली आहे. चीनकडून इराणला शस्त्रांची मदत करणारे जहाज रवाना केले गेल्याचे वृत्त अलिकडेच प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी ही धमकी दिली आहे. जर अशा प्रकारे चीनने इराणला मदत केल्याचे आम्ही पकडले, तर अमेरिकेत येणाऱ्या चिनी उत्पादनांवर अमेरिकेत ५० टक्के अतिरिक्त आयात शुल्क लावले जाईल. Donald Trump आपण इराणला एक दिवसात संपवू शकतो. एक दिवसात त्यांची उर्जा सामुग्री ताब्यात घेऊ शकतो. उर्जा प्रकल्प, विद्युत प्रकल्प किंवा तसे मोठे प्रकल्पही ताब्यात घेतले जाऊ शकतात, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीन इराणला विमानविरोधी शोल्डर मिसाईल देत असल्याचे वृत्त समजले आहे. तशी शक्यता खरी असावे असे आपल्याला वाटत नाही. मात्र खरोखर चीनकडून इराणला अशी मदत केली गेली, तर चिनी उत्पादनांवर अतिरिक्त आयात शुल्क लावले जाईल, असे ते म्हणाले. पण चीनकडून इराणला शस्त्रांची मदत केली जाते आहे किंवा इराणला मदत करण्याचा चीनचा इरादा असल्याचे वृत्त चीनने सपशेल फेटाळून लावले आहे. ही एक बिनबुडाची बातमी आहे. चीनने नेहमीच लष्करी सामुग्रीच्या निर्यातीबाबत काळजी घेतली आहे आणि जबाबदारीची भूमिका निभावली आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी नियमित पत्रकार परिषदेत सांगितले. दुसरीकडे अमेरिकेने केलेल्या नाकाबंदीला मोडून काढण्यासाठी इराणचे फास्ट अटॅक जहाज पुढे सरकत असल्याचे वृत्त आहे. हे जहाज फार जवळ आले, तर ते नष्ट केले जाईल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.